मी आणि माझा भाऊ असेच काही कामानिमित्त मुंबईला चाललो होतो.... वोल्वोचे आरक्षण मिळाले होते.... त्या मुळे आम्ही दोघेही खुश होतो... नेहेमी वोल्वोने नाही जात... त्या मुळे अजुन टिपिकल वोल्वोचे चे प्रवासी झालो नव्हतो.... आलिप्त वगैरे रहाणे आम्हाला जमत नव्हते आणि अजुनही जमत नाही.... विशेष करून जर बाजुला काही interesting प्रसंग चालु असेल तर.....
गाड़ी नेहेमीप्रमाणे उशिरा आली.... तसा फार काही उशीर नव्हता झाला ... २८ मिनिट फ़क्त... एका प्रवाशाने केली तेवढ्यात सुरुवात.....
प्रवासी : साहेब गाड़ी अर्धा तास लेट झाली की हो....
साहेब : गाड़ी २८ मिनिट लेट आहे... ३० नाही..... (साहेबानी विकेट काढली...)
प्रवासी : साहेब २ मिनिट म्हणजे काही जास्त नाही (गुगली टाकायचा प्रयत्न ) ....
साहेब : अहो, २ मिलीसेकंद मधे सुवर्ण पदक जाते.... २ मिनिट काहीच नाही कसे म्हणता ... (सिक्स़र) ....
प्रवासी जरा बावरला, काय करणार पुण्याचा नव्हता....
साहेब : (सांत्वनास्पद भाषेत ) अहो साहेब , जरा मजेत बोललो, एवढे काय मनाला लाउन घेता... येइल हो गाड़ी २ मिनिटात ... जरा कुठे ट्रैफिक मधे अडकली असेल...
साहेबाना बहुतेक कोणी तरी कानात भविष्य सांगितले असावे... कारण खरोखर गाड़ी २ मिनिटात आली... आपले शब्द खरे झाल्याचे पाहून साहेबसुद्धा दचकले... आपले शब्द खरे करण्यासाठी जणू कंडक्टर साहेबानी गाड़ी वेळेवर आणली असे वाटुन त्याना ज़रा गहिवरून आले...
तेवढ्यात कंडक्टर साहेबानी आरोळी दिली " फ़क्त reservation वाल्यानी बसा.... गाड़ी फुल हाय...."
त्या आरोळीला समोरून दाद आली.... " Reservation आहे म्हणुन तर थांबलो नाहीतर गेलो असतो निघून..... २९.३० मिनिट झाले ..... बरोबर का कंट्रोलर साहेब "
कंट्रोलर साहेबानी काचेतुनच मान डोलावली... टोमणा समजला होता... पण आता हां भिडू जाणार आहे, उगाच कशाला डिवचा म्हणुन कंट्रोलर साहेब गप्प बसले...
आता खरेतर सर्वच जण reservation वाले होते .... तरी पण मी आणि भाऊ पळत आत घुसलो... कारण एकच.... विण्डो सीट.... पण भाऊ जरा जास्तच धडधाकट असल्याने त्याने "साम, दाम आणि भेद" ह्यांचा वापर न करता "दंडाचा" वापर करून विण्डो सीट काबिज केली.... आता वोल्वो असल्याने २ X २ सीट्स होत्या.... विण्डो मधे भाऊ , बाजुला मी.... माझ्या बाजुला म्हणजे पलिकडच्या साइडला एक तरुण (उतार वयातील) मुलगा आणि त्याच्या बाजुला एक तरुण, सुंदर मुलगी बसली होती.... (हां पलिकडच्या सीट वरचा क्रम बदलून जरा लालित्य साधायचा विचार मनात आला होता... पण आपण लालित्या पेक्षा सच्चाई ला जास्त मानतो.... असो )... तो मुलगा स्टैंड वर असल्या पासून प्रार्थना करत असावा अशी सीट मिळावी म्हणुन... कारण तो स्टैंड वर सारखा त्या मुलीवर आणि तिच्या बरोबर आलेल्या मुलावर लक्ष ठेउन होता... त्या मुलीबरोबरच्या मुलाने जेव्हा बस लेट झाली म्हणुन कंट्रोलर साहेबांशी हुज्जत घातली तेव्हा पण तो लक्ष देऊन ऐकत होता....
गाड़ी सुटली... मी पण गेलेल्या विण्डो सीटचे दुःख न करता ( दुःख करून पण काही मिळणार नव्हते , कारण सर्व खाद्य पदार्थ भावाकडे होते) , भावाशी परत हातमिळवणी केली... आम्ही दोघे त्या (उतार वयातील) तरुणाची मजा एस टी स्टैंड पासून बघत होतो... ती continue केली... त्या मुलाने पण धीर करून बोलायला सुरुवात केली.... नाव वगैरे विचारले आणि खड़े टाकायला सुरुवात केली
तरुण : तुम्ही काय करता???? ( पहिला खड़ा टाकुन पाहू...)
मुलगी : मी एक कंपनीमधे सॉफ्टवेर डेवलपर आहे... (त्या मुलीने कुठले तरी अगम्य नाव सांगितले... स्पष्टपणे कटवत होती त्या मुलाला)
तरुण : अच्छा अच्छा .... मग कुठल्या टेक्नोलॉजीवर काम करता आपण???
मुलगी : (तुला काय करायचे आहे...) तसे काही नाही... मी जनरली जावा आणि C# वर काम करते...
तरुण : अरे वा वा ..... पण मध्ये काहीतरी जावाला डिमांड कमी झाली असे ऐकले होते... तसा माझा आणि कंप्यूटर चा विशेष संबंध नाहीये ... फ़क्त मेल्स वगैरे चेक करतो... तेवढाच...
(कंप्यूटर तसे नविन आहेत.... आपल्या वयाच्या दृष्टीने... इति माझा भाऊ => मला )
मुलगी : नाही हो.... स्किलसेट असला की काही प्रॉब्लम नाही येत.... आणि आता मला चांगला एक्स्पीरिएंस पण आहे... त्यामुळे काही स्लो डाउन आले तरी आम्ही बरेच सेफ असतो.... नविन किंवा अनस्किल्ड लोकांना प्रॉब्लम येऊ शकतो...
तरुण : (एकदम टोमणा समजल्याने विषयांतरासाठी ) हां, ते तर झालेच ... अच्छा एक सांगा .... तुमच्या बरोबर जो मुलगा आलेला, फार चिडलेला दिसत होता हो.... तुम्हाला ते कंट्रोलर काही बोलले का???
मुलगी : छे छे... अहो गाड़ी लेट झाली म्हणुन तो वैतागला होता....
तरुण : काय गाड़ी लेट होणे विचित्रपणा आहे... आपल्याकड़े वेळेचे महत्व नाहिये लोकाना .... तसा मी नेहेमी स्वतःच्या वेहिकल ने जातो... Alto AC ने.... पण आजच काय सुचले आणि ह्या वोल्वो ने जाऊ म्हटले.... आणि नेमकी गाड़ी लेट....
(इम्प्रेशन मारण्याचा केविलवाणा प्रयत्न... मी => माझ्या भावाला)
मुलगी : अरे अरे .... (मनातल्या मनात... मनहूस... म्हणुन गाड़ी लेट झाली तर...)
(तेवढ्यात मागच्या आजींची कुजबुज ऐकू आली... "अवलक्षणी कार्टा आहे.... कधी नाही ते आला आणि गाड़ी लेट केली ...." )
तरुण : बर ते जाऊ दे .... चिडणार नसाल तर विचारतो ... कोण होता हो तो मुलगा??
(इकडे त्या मुलीच्या चेहर्यावर त्रस्त भाव स्पष्ट दिसू लागले होते...)
मुलगी : तो माझा fiance आहे... का हो??? तुम्ही ओळखता का त्याला???
तरुण : छे छे ..... तस नाही... एकदम "Angry Young Man" दिसतो... हेहेहे
(उगीचच बत्तिशी दाखवण्याचा प्रकार)
मुलगी : (काय ताप आहे डोक्याला, असा चेहरा करून) अहो आम्ही बसून बसून कंटाळलो होतो... तो म्हटला चल जरा पुण्यातल्या लोकांची मजा दाखवतो... म्हणुन मग जरा बोलला जाउन आणि उत्तरे ऐकली आम्ही..
तरुण : ओह्ह ... म्हणजे एकदम इम्प्रेशन मारायचा प्रयत्न म्हणा ना..
(आणि तुम्ही करताय ते काय काका. ..इति मी => माझा भाऊ.....)
मुलगी : नाही नाही, त्याला त्याची गरज नाही..... त्याने मला आधीच इम्प्रेस केले आहे...... नविन काही करायची गरज नाही...
तरुण : (ओशाळुन जाउन) नाही नाही... तुम्ही गैरसमज नका करून घेऊ... मी सहज म्हटलो... बाय द वे काय करतो हो तो????
(कुठे तरी इम्प्रेशन मारता येते का??? ह्याची चाचपणी सुरु आहे.....इति माझा भाऊ => मला )
मुलगी : (हां काय गप बसत नाही.....) तो एक MNC मधे आहे... खुप चांगल्या कंपनी मधे आहे तो.... एकदम यंग असतानाच चांगली संधि मिळाली आहे
( मुलगी पुण्याची नसली, तरी टोमणा चांगला मारते ... परत माझा भाऊ => मला ,
मग सासर पुण्याचे असणार आहे ना..... इति मी => माझ्या भावाला)
तरुण : हे हे... वा वा .... मी पण अशाच एका MNC मधे आहे.... मलाही अशीच संधि मिळाली होती... (तेवढ्यात बाजुला त्याच्या कंपनी ची बिल्डिंग आली असे त्याने सांगितले, खरे खोटे देव जाणे)
तरुण : ते पहा माझे ऑफिस... खुप धमाल करतो आम्ही इकडे ...
(कुणी विचारले आहे का???..... इति माझा भाऊ => मला)
मुलगी : ( फ़ोन वर खेळत खेळत) वा वा (उपरोधात्मक स्वरात)...... काय मज्जा आहे ना....
तरुण : (काही झाले तरी हार नाही मानायाची) तुम्ही पुण्याच्याच का??
मुलगी : नाही... (संभाषण कामितकमी शब्दात सम्पवायची इच्छा स्पष्ट करीत)
तरुण : अच्छा , मग मुंबईच्या वाटत...
मुलगी : आता गाड़ी तर मुंबईलाच जाते ना.... तुम्ही पुण्याचे वाटत...
तरुण : नाही हो... मी पण मुंबईचा आहे ... पण गेली बरीच वर्ष पुण्यात असतो...
(ते दिसते आहे काका... बरीच वर्ष आणि पुण्यात वास्तव्य दोन्ही गोष्टी सिद्ध होत आहेत... इति माझा भाऊ => मला )
तरुण : मी कांदिवलीला राहतो , तुम्ही???
मुलगी : मी बोरीवलीला.... excuse me ह.... ज़रा फ़ोन येत आहे मला...
(ती मुलगी शुअर बोरीवलीला रहात नाही इति मी => भावाला)
मग ती मुलगी पुढचे २ तास फ़ोनचे handsfree कानाला लाउन होती... जरा वेळाने त्या तरुणाने त्या मुलीचे लक्ष वेधण्याचे अनेक (असफल) प्रयत्न केले.... मग ती नाही लक्ष देत बघून त्याने आपला मोर्चा मागच्या २ आजींकडे वळवला.... त्या आजींचे कुठल्या स्टाप वर उतरायचे ह्यावर एकमत होत नव्हते.... तिकडे ह्याने आपले मत मांडण्यास सुरुवात केली......
आजी १ : मला चकाल्याला जायचे आहे... कुठे उतरणे बरे पडेल हो??
आजी २ : मला काही विशेष कल्पना नाही... पण पार्ल्याला उतरणे सोपे पडेल...मी ५-७ वर्षानी येत आहे मुंबईला.... त्यामुळे काही लक्षात नाही....
तरुण : sorry आजी.... मी तुमचे बोलणे ऐकले... ऐकायला नको होते..... पण मला असे वाटते की तुम्ही जोगेश्वरीला उतरून गेलात तर सोईचे पडेल....
आजी १ : (मनातल्या मनात ... मेला, आजी म्हणतो... तुझ्या आईच्या वयाची मी.... त्यात चोरून बोलणे ऐकतो आणि वर निर्लज्जपणे सांगतो .....ती मुलगी कंटाळली ... आता आम्हाला कशाला छळतोस...) अरे ठीक आहे ... आम्ही कंडक्तर ला विचारू...उगीच तुला त्रास नको...
(१ ल्या आजी कंडक्तरला विचारायला गेल्या)
आजी २ : अरे पण जोगेश्वरी फार पुढे येते रे..... मी ७ वर्षांपूर्वी आले होते.... फार लांब होइल रे जोगेश्वरी...
तरुण : आजी , मी मुंबईमधे लहानाचा मोठा झालो आहे... मला नीट माहीत आहे हां पूर्ण एरिया....
मुलगी : आजी, चकाल्याला जायचे असेल तर अंधेरी ला उतरा.... ते सोयीचे पडेल..... रिक्शा पण मिळेल लगेच...
आजी १ : हो हो... कंडक्तरपण तेच म्हणाला ... अंधेरीहुन रिक्शा पण मिळते...
तरुण : (चेहरा पाडून) मी बरीच वर्षे तसा मुंबईला नाही राहिलो...त्यामुळे जरा विसरायला झाले आहे...
हे ऐकायच्या आधी परत मुलगी फ़ोन मधे बिजी झाली.... लगेचच आजींचा पण फ़ोन वाजला आणि अचानक दोन्ही आजी पण फोन वर बिजी झाल्या.... .... त्याने माझ्याकडे पाहिले... पण त्याने बहुधा माझे आणि भावाचे संभाषण ऐकले असावे... कारण मी दिलेल्या स्मितहास्यानंतरसुद्धा त्याने आमच्याकडे कुत्सित नजराने पाहून मान टीवी कड़े वळवली... आणि अचानक त्याला सुद्धा कुणाचा तरी फ़ोन आला.... आणि पुढचा अर्धा तास तो फ़ोन वर बिजी झाला...
(समाप्त)
वि सु . : लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित ... ...लेखक आणि त्याचा भाऊ ह्या सत्य घटनेचे "प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (आय विटनेस)" ...
लेखक : गुरुप्रसाद आफळे
