आणि परत लग्नात अनेक माणसे अनेक वर्षांनी भेटतात..... म्हणजे अगदी १०-१५ वर्षानी सुद्धा... त्यानी आपल्याला ज्या वेळी पाहीलेले असते तेव्हा आपण अगदी लहान असतो... म्हणजे ५-६ वर्षांचे... आणि ते तेव्हा चांगलेच मोठे असतात... कमीत कमी १५-१६ ते जास्तीत जास्त कितीही.... मग आपण १५-१६ वर्षांपूर्वी किती लहान होतो (आता असणारच... २२ वर्षांचा मुलगा १५-१६ वर्षांपूर्वी लहानच असणार.... पण ते ऐकवूनदाखवतात...) आणि आपण तेव्हा कसे वेड्यासारखे वागलो होतो हे सर्व ऐकवतात... आपल्याला कमी आणि आजूबाजूच्या लोकांना जास्त...... म्हणुनच मी सहसा असे प्रसंग टाळतो.... (उगीच लोकाना का कळु द्या लहानपणीमी दंगा केला आहे ते... आणि तसे सगळेच करतातच की....) पण कधी कधी अगदीच नाईलाज होतो आणि जावे लागते.... अशा वेळी पण मी तसा गर्दी पासून लांब एकटा राहतो... न जाणो कुणी एकदम ओळख दाखवून अचानक लहानपणीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली म्हणजे...
पण कधी कधी तेहि आपण कसे तरी सहन करतो... पण जर कुणी तालासुरात आणि स्वरचीत म्हणु लागले मंगलाष्टके की मग झोप अनावर होते.... आणि जर अर्थ danger असेल तर मग विचारायलाच नको...
परवा असाच एक प्रकार झाला... एका फार लांबच्या भावाच्या लग्नाला जावे लागले... (कारण मला कार्यालयाचा पत्ता माहीत होता.... पाहुण्यांना पत्ता माहीत नव्हता ) ३० मिनिट पुण्यामधे गाड़ी चालवून अगदी थकून गेलो होतो...उशिरा गेलो होतो......बाकी सर्व विधी झाले होते ....
मी आपला कोणी ओळखीचे दिसते का म्हणुन शोधत होतो...तेवढ्यात बाजुनी आवाज ऐकू आला .....
"अरे कोण प्रसाद ?? ये ये ...."
मी चमकून बघितले...... तर समोर काका उभे... जाउन भेटलो काकांना.... कसे आहात वगैरे विचारणा झाली... त्यानी बाजुच्या एक "माणसाला" बोलावले....
काका : ओळखलेस का ह्याला ??
मी : हेहे ... चेहरा ओळखीचा वाटतोय... नाव नाही लक्षात येत आहे... ( मला चेहरापण आठवत नव्हता... पण उगाच वेळ मारून न्ह्यायचा प्रयत्न)
काका : अरे हा तुझा दादा..... (त्यानी काही तरी नाव सांगितले).... अरे तुझी आत्येबहिण आहे ना... तिच्या चुलतभावाचा सख्खा मावस भाऊ... ( बापरे... मी नाते पाठ करून ठेवले... परत विचारले तर काय घ्या....)
(मला खरोखर लक्षात आले नव्हते.... पण आता अशा ठिकाणी जास्त विचार करायला वेळ नसतो... म्हणुन मग सुरुवात केली )
मी : अरे हा हा .... बरोबर... अरे दादा कसा आहेस???? किती वर्षानी भेटत आहे आपण??? (मनातल्या मनात ... बहुतेक पहिल्यांदाच...)
दादा : मजेत आहे रे.... तू कसा आहेस??? काय करतोस??? केवढा मोठा झाला आहेस..... मागे ताईच्या लग्नात भेटलो होतो... ४-५ वर्षांचा होतास तू.....
मी : हा हा .... म्हणुनच मला नाव लक्षात येत नव्हते... (च्यायला इथे काल काय जेवलो लक्षात नाही रहात... हा गडी १७ वर्षांपूर्वीची आठवण काढतो आहे ... ४-५ वर्षांचे असताना आपण काय केले हे फ़क्त "आत्मचरित्र" लिहिणार्या लोकांना आठवते... "नॉर्मल" सामान्य लोकांना नाही...)
दादा : काय गोंधळ घातला होतास तू....किती त्रास द्यायचास सर्वाना.....
(इथे काही "जुन्या, दुर्मिळ" आठवणी समोर आल्या ... त्या आठवणी गुप्त असण्यातच ( लेखकाचे) जग सुखीराहील..... अप्रकाशित आठवणी ऐकण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा...)
मी : (उगीचच हसून).... अरे आता मला नाही आठवत... (मनातल्या मनात..... कोणाला माहीत खरे सांगतोय का फेकतोय... )
आता हा दादा माझ्या पेक्षा १२-१३ वर्षानी मोठा..त्यामुळे ह्याने ४-५ वर्षाचा असताना ह्याने काय केले मला कसे माहीत असणार... म्हणुन मग गैरफायदा घेत होता तो...
त्याची मुलगी गोंधळ घालत होती... कोणीतरी येउन म्हणाले.......
"बघ अगदी तुझ्यावर गेली आहे... तू पण असाच होतास.... आठवते ना... किती छळायचास आम्हाला.... आता तुझी मुलगी बघ...."
हे ऐकून अचानक तो निघून गेला... बहुतेक माझ्या चहर्यावारिल भाव आणि मनातील प्रश्न - काय केले होतेस तू४-५ वर्षाचा असताना??? त्याला कळला असावा....... उगीच बाका प्रसंग नको म्हणुन पळुन गेला....
मंडपात येताना हातात एक कागद दिला गेला होता ... कुठली जाहिरात असते तसा होता... मी फेकून देणारहोतो...पण म्हटल राहू दे... निवांत वाचू... तेवढ्यात वरती नजर गेली... मथळा होता
"
मंगलाष्टके
चि . सौ . का . XXXX च्या विवाहात सौ . xxxxx आणि सौ . xxxx कडून सप्रेम भेट
कवयित्री : (इकडे पहिल्या xxxx चे नाव..)
चाल आणि संगीत : (इकडे दुसर्या xxxx चे नाव)
"
जरा नजर फिरवली आणि भावी संकटाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली.... ती अक्षरशः "अष्टके " होती...
प्रत्येक ओळीत शब्द ८ च्या पटित .... प्रत्येक कडव्यात ओळी ८ च्या पटित.... फ़क्त शद्बा मधील अक्षरे आणि कड़वी ८ च्या पटित नव्हते ... कड़वी ६ होती .... पहिले आणि शेवटचे अशी २ कड़वी गुरूजी म्हणणार होते.... मला अचानक गुरुजींचा आधार वाटु लागला...
तेवढ्यात गुरुजींचा ठेवणितील आवाज ऐकू आला.... आणि मंगलाष्टके सुरु झाली ... पहिले मंगलाष्टक कुठले तरीटिपिकल होते.... त्या नंतर मात्र "श्लोक" सुरु झाले... त्या श्लोकांचा अर्थ खरोखरच दणदणीत होता....
आता श्लोक तर काही लक्षात नाहित... पण दणदणीतपणा मुळे अर्थ असा मनावर "उमटला" गेला (emboss)
श्लोक काहीसे असे होते
श्लोक १ : इकडे मुलीच्या माहेरचे तुफ़ान कौतुक केले होते.... म्हणजे अगदी सर्वगुण संपन्न (आणि त्यासाठी उगीचच सासरचे वर्णन टिपिकल वाईट केले होते...)
मुली, तू सासरी निघाली आहेस... तुला माहेरी अगदी लाडात वाढवले आहे... कसलीही कमी पडून दिली नाही..... पण सासरी असे असेलच असे नाही.... आई बाबा तुला कधी रागावले नाहित... पण सासू तुला कटु बोल ऐकवेल... (इकडे मुलीची सासू... तिचा चेहरा पडला... तिने स्वतःच्या मुलाला तर सोडाच... पण कामावाल्यानाही कधी "कटु" बोल ऐकवले नव्हते... आणि डायरेक्ट लग्न मंडपात असे काही ऐकवले गेले....) पण तू सुद्न्य आहेस .... कधी मर्यादा ओलांडू नकोस... शब्दाला शब्द वाढवू नकोस... तुझे आई-बाबा आदर्श आहेत... तू पण तशीच वाग... इ इ उपदेशांचे डोस पाजले होते... (१६ ओळी)
श्लोक संपत कसा नाही असा विचार करत होतो... इतक्यात शुभमंगल सावधान असे ऐकू आले... काही यमक वगैरे काही नाही... डायरेक्ट उपदेश झाला की सावधान...
श्लोक २ : इकडे सासरची देवमाणसे आणि त्यांचे कौतुक... पण इकडे माहेरच्यांचे काही नाही.... (कवत्रियीमुलिकडची होती... माझ्या मनात परत विचार) मुली, तुझे सासू सासरे देव माणूस आहेत... मुलाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.... त्यामुळे आता तू त्याना मुली सारखी आहेस... (म्हणजे जर लहान बहिण असती तर ही मुलीसारखी नसती का झाली ... माझी अजुन एक शंका) मुलाचे आजी आजोबा पण खुप चांगले आहेत.... सगळ्याना मान दे ... तूझे नशीब थोर म्हणुन तुला असे सासर मिळाले... (८ ओळी)
(मागचा श्लोक आणि ह्याचा कुठे तरी संबंध लागतो का हे पाहण्यासाठी मी ते पान वाचू लागलो.... पण माझे प्रयत्नव्यर्थ गेले.... काहीच संबंध नाही.... मला वाटले... मुलाकडच्या कुणीतरी हा श्लोक लिहिला असेल... पण तसे काही नव्हते... शेवटी मी प्रयत्न करणे सोडले....)
परत शुभ मंगल सावधान.....
श्लोक ३ : इकडे माहेरच्या लोकांचे नावासाहित कौतुक... म्हणजे काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या इ.इच्या नावासाहित... प्रत्येकाचे नाव गुंफले होते... शेवटी तर कवयित्रीचे सुद्धा नाव होते.... जणू काही पुराणकाळातील स्तोत्र आहे... "xxxx ने रचिले हे स्तोत्र xxxxx देवाचे " त्या तालावर ...
"xxxxx ने रचिले हे मंगलाष्टक (की षटक माझी परत शंका), संगीत दिले xxxxx ने आणि गाई (गायन करी ह्याअर्थाने) xxxxx" (परत १६ ओळी)
म्हणजे कवयित्री चे नाव २ दा (कारण तीच म्हणत होती) चीटिंग आहे अजुन एक विचार माझ्या मनात ...
शुभ मंगल सावधान.....
श्लोक ४ : (श्लोक क्रमांक ३ प्रमाणे , पण कौतुक सासराच्यांचे) हा श्लोक अगदी मोजुन ८ ओळीन्मधे संपला ... जास्त काही सुचले नसावे... माहेराचा श्लोक १६ ओळीन्चा होता... आणि हयात अगदी औपचारिक कौतुक होते... नाव कुणाचे नव्हते... फ़क्त लोक चांगले आहेत... संस्कार चांगले आहेत... प्रेमळ माणसे आहेत... इ.इ.... म्हणजे विशेष काही नव्हते कौतुकामधे... समोरच्याला ओळख करून द्यावी असे..... (८ ओळी)
शुभ मंगल सावधान.....
श्लोक ५ : इकडे मुलीला कसा आदर्श नवरा मिळाला आहे.... ह्याचे वर्णन... (आता मुलगा आणि मुलगी एकमेकाला४ वर्ष ओळखत होते.. प्रेमविवाह होता.... तिला नविन काय सांगणार ही कवयित्री....) पण श्लोक ऐकताना वाटले की मुलगापण पहिल्यांदा एवढे कौतुक ऐकत असेल स्वतःचे.... मुलगा अतिशय विनम्र आहे... शांत आहे.... सज्जन आहे... गुणी आहे..... हुशार आहे.... इ.इ... (म्हणजे जणू काही लग्न ठरवत आहे... कुणीतरी सांगा तिला जाउन लग्न चालु आहे , ठरवायचे नाही माझे मौलिक मत....) मुलगा आई वडिलांचा( मुलीच्या) मान ठेवेल... मुलीला सुखात ठेवेल... मुलीने आदर्श वागले पाहिजे... इ.इ..... ( ८ ओळी)
शुभ मंगल सावधान...
(रामदास स्वामी "शुभ मंगल सावधान" ऐकल्यावर का पळाले हे मला आत्ता कळले.... तेव्हाही अशीच कुणी कवयित्री असणार ... आणि तेव्हा तर लोकांना जेवण करून दुपारी ऑफिस गाठायची घाई पण नसणार .... मग मोठमोठे श्लोक झाले असणार....पहिला श्लोकच एवढा लांबला असेल की सहनशक्ति संपून त्यानी धूम ठोकली असेल मन्डपातुन .... मुलाच्या मनातही असे काही विचार सुरु असल्याची चिन्हे दिसू लागली होती..... चक्क जांभई दिली मुलाने आणि मुलीने सुद्धा )
( गायिकेच्या चेहर्यावर साक्षात परमानंद, इतरांच्या चेहर्यावर सुटत आलो एकदाचे हे भाव स्पष्ट .... गुरूजी आणि त्यांचे मदतनीस अंतरपाट धरून कन्टाळले होते... अंतरपाट एका साइडने कलला होता आणि मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा स्पष्ट दिसत होते.....)
श्लोक ६ : (कड़वी कमी पडत असल्याने हयात २ भाग होते)
भाग १ : इकडे मुलाला किती चांगली मुलगी बायको म्हणुन मिळाली आहे ह्याचे कौतुक .... सन्दर्भ थोड़े वेगळे ...
पहिले काही मुद्दे सारखे होते... उदा. गुणी, शांत, विनम्र इ.इ..... मग पुढे टिपिकल मुलीचे गुण.... सुंदर आहे...सालसआहे...मुलाच्या नावाला शोभेल असे मुलीचे नाव ठेवणार होते (म्हणजे मुलाच्या नावाला आ जोडून) लग्नानंतर... त्यावरून कौतुक की किती चांगला जोड़ा( couple, दुसरा अर्थ घेऊ नये) आहे .... लक्ष्मीनारायणाला लाजवेल असा इ.इ.... (१२ ओळी....)
भाग २ : सर्व लोकांचे आभार मानले गेले... (आभार प्रदर्शनाची संधि नाही सोडली.... इति मी)... सर्व लोक विनंतीला आणि आग्रहाला मान देऊन आले.... शुभचिंतक आले... आशीर्वाद दिले त्या साठी त्यांचे आभार ....इ.इ..... (४ओळी)
शुभ मंगल सावधान....
परत गुरुजींचा ठेवणितला आवाज ऐकू आला.... अगदी हायसे वाटले सर्वानाच... अगदी नवर्या मुला-मुलीला सुद्धा लगेच सर्व विधि संपले १० मिनिटात... म्हणजे मंगलाष्टक २३ मिनिटे आणि उरलेले १० मिनिटे... परत आभारप्रदर्शन आणि भोजन बागेत सुरु झाल्याची घोषणा (परत कवयित्री कम गायिका) दोन्ही झाले ....हयात सुद्धा जरासाहित्यिकपणा आणला गेला.... मी पण "आभार" मानून लगेच तिकडे भोजनासाठी पळालो...
(समाप्त)